याच साठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा...."
आजची ही पोस्ट लिहिण्याचे कारण असे की,"चांगल्या व्यक्तीमधील चांगुलपणाचा प्रसार व्हावा आणि समाजातील अधिकाधिक लोक चांगुलपणाने वागावेत , यासाठी आपल्याला जे जे चांगले वाटते ते निःसंकोचपणे मांडावे!" असे आमचे मार्गदर्शक व पत्रकार आदरणीय मधुकरदादा नेहमी सांगतात .
माझी मुलगी वैष्णवी हिची जिवलग मैत्रीण अस्मिताच्या आजोबांचे 26 जानेवारी रोजी निधन झाले. वैष्णवी आमच्या घरी कमी पण अस्मिताच्या घरी अधिक असते असे म्हटले तर वावगे होणार नाही. अस्मिताने आपल्या आजोबांना कधी चाललेले पाहिलेच नाही. एक नव्हे दोन नव्हे तब्बल पंचवीस वर्ष ते बेडवरच होते. 1996 साली पायाला जखम झाली व गॅंगरीन झाले त्यामुळे त्यांच्या एक पाय गुडघ्यापासून काढावा लागला. सैन्यातून निवृत्त झालेले आजोबा पैलवान शोभावे इतके तगडे व व ताकद वान असेच होते.... त्यांचे सर्व विधी घरातच होत असत.
अस्मिता ची आई अर्चना ताई वडील युवराज दादा खूप प्रेमाने व निष्ठेने त्यांची सेवा करत. अस्मिताच्या आईचे लग्न झाले तेव्हा आजारी सासरे व मधुमेहाने त्रस्त असलेल्या सासुबाई (अस्मिताच्या आजी ) दोघेही आजारी असेच होते. काही वर्षांनी आजींचे निधन झाले. त्यानंतर आजोबांना वेळ देता यावा म्हणून अस्मिता च्या वडिलांनी शेती दुसऱ्याला लावली व ज्या दुग्ध व्यवसायावर त्यांचा चरितार्थ चालत होता तो दुग्ध व्यवसाय त्यांनी पूर्णपणे थांबवला.
अखेरच्या काही दिवसात आजोबांच्या घशात मोठीशी गाठ झाली आत रक्त व पस तयार झाला. त्यामुळे त्यांना काही खाता येत नव्हते भाकरी मिक्सरला लावून, रव्याचे पातळ खीर असे काहीबाही उपाय करून खायला घालावे लागे. सतत गळणारी लाळ यासाठी त्यांनी चार-पाच टॉवेल केले होते. एखाद्या लहान बाळाच्या गळ्याभोवती टॉवेल टाकून आई भरवते त्याच पद्धतीने आजोबांना भरवावे लागे. रोज डे टोल टाकून फरशी पुसणे, बेडशीट चादर धुने त्यांचे टॉवेल धुणे, खाणे पिणे, आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य हे साधारण चार-पाच महिने चालू होते. इतके करूनही या दोन्ही उभयतांच्या चेहऱ्यावर नाराजीचा लवलेशही नाही अथवा कपाळावर किंचितही आठी नाही ! सदैव हसत मुख व सेवेस तत्पर..... ..
हे सर्व या दोन्ही मुली पाहत होत्या. काकींची व काकांची होणारी धावपळ वैष्णवी वर्णन करून सांगत असे. सारे ऐकून मीही स्तंभित होत असे. एकीकडे औषध गोळ्यांना पैसे न देणाऱ्या मुलांची कर्मकहाणी सांगणाऱ्या आज्या भेटत तर दुसरीकडे जिवापाड जपणारे हे दोघे!
एकाच विधात्याने तयार केलेली ही माणसे असे कसे वागत असतील?
आपण संस्कार या मूल्यावर काम करावे म्हणून संस्कार वर्ग घेतो पण संस्कार हे अनुकरणातून घडत असतात ते कुणीही शिकवावे लागत नाही. अस्मिताच्या भाऊ ओमकार व अस्मिता दोघेही खूप भाग्यवान ज्यांना असे आई वडील लाभले! ही दोन्ही मुले ही आजोबांचे प्रेमाने सारे करत. शाळेतल्या गमती जमती आजोबांची शेअर करीत. वडिलांनी आणलेला खाऊ सगळ्यात आधी आजोबांना भरवत.
या सार्या गोष्टी आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळेच तर होत नाहीत का?
अस्मिताच्या आईचे खूप कौतुक वाटते! कित्येक वर्षात ती एकही दिवस माहेरी वस्तीला गेलेली नाही अगदी तिच्या भावाचे लग्न झाले तेव्हाही ! एखादी स्त्री भांडखोर असेल तर विचारतात तिचे माहेर कुठले? अस्मिता च्या आईने आपल्या सासरचा तर सन्मान राखलाच पण माहेरचा ही सन्मान केला आपल्या अगत्य पूर्ण वागण्याने! इतक्या सोशीक स्वभावाच्या मुलीला घडवणारे तिचे आई-बाबाही थोरच!
मैत्रिणींनो., ही पोस्ट जाणीवपूर्वक लिहीत आहे कारण आज बदलणारा समाज पाहिला की अशा व्यक्तीं पुढे नतमस्तक व्हायला होते. आपणही कुणाच्या मुली सुना आहोत. आपणालाही म्हातारपण येणार आहे तेव्हा आपल्या वर्तणुकीतून मुलांना चांगले वळण लावायची असेल तर आतापासूनच आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेण्याची आज खरी गरज आहे!
आज अस्मिता च्या आजोबांचे उत्तर कार्य आहे . त्यांचे नशीब थोर की असे मुलगा व सून लाभले त्यांचा शेवटचा वेदनादायी काळही या सर्वांच्या प्रेमाने तरुन नेला....
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! अस्मिताच्या संपूर्ण परिवारा प्रति खूप खूप कृतज्ञता! एक चांगलं आदर्श गावासमोर ठेवल्याबद्दल...... आपणही त्यांच्यासारखे बनायचा प्रयत्न करूया तर मग!
सौ. वैशाली आनंदा पाटील.
बस्तवडे तालुका कागल
0 Comments