कधी कधी प्रवास मुळाकडे पण जाणारा असतो..!
1965 मध्ये आदर्श समाज शिक्षक हभप बळवंत भैरू लवाटे गुरुजी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली बस्तवडे ता कागल येथे श्री विठ्ठल मंदिराची स्थापना झाली व त्याच वर्षी पहिला हरिनाम सप्ताह संपन्न झाला..तिथून 2019 पर्यंत सलग 55 वर्षे हा नामसप्ताह अखंड पणे होत आला मात्र यंदा कोरोना या जागतिक विषाणू मुळे हा सप्ताह दीप वगळता रद्द करावा लागला.
1965 पासून गावात बऱ्यापैकी विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन सुरू झाले मात्र तत्पूर्वी गावात भजन परंपरेची सक्षमपणे सुरुवात झाली ती चिखलकर मास्तरांच्या घरी..! त्या दरम्यान चावडी जवळ तुका नाना म्हनजेच तुकाराम पाटील यांच्या घरी देखील लोहार वांगळे अशी काही मंडळी भजन करीत असतं. पण भजनाला नित्य सेवेचे स्वरूप दिले ते चिखलकर मास्तरांनी.
नवी पिढी म्हणेल ,कोण चिखलकर मास्तर..?
श्री.अनंत दत्तात्रय जाधव-चिखलकर मामा यांचे ते वडील होत.त्यांचे नाव दत्तात्रय तात्याजीराव जाधव. ते सुरुवातीला काही वर्षे कौलगे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते व त्यावरूनच त्यांना चिखलकर मास्तर हे नाव पडले..! आडनाव जाधव पण टोपण आडनाव चिखलकर हेच खूप प्रचलित आहे.
तर अगोदर शिक्षक म्हणून सेवेस प्रारंभ केला असला तरीही काही वर्षातच ते कल्याण येथे रेल्वे पोलीस म्हणून रुजू झाले.तिथे असतानाच त्यांना काही मित्र संगतीने सांप्रदायिक ओढ निर्माण झाली व विशेष म्हणजे वारकरी परंपरेतील थोर सत्पुरुष दांडेकर मामा यांचा त्यांच्यावर प्रभाव होता व त्यातूनच ते वारकरी झाले. त्यामुळेच पोलीस म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी ब्राह्मण गल्लीत आपल्या घरी 1957/58 च्या दरम्यान भजन परंपरा सुरू केली. स्वतः ते कोणतेही वाद्य वाजवत नव्हते मात्र अभंग सांगायचे..!
1940 मधील दीड रु किमतीची छोट्या आकाराची तुकाराम गाथा देखील त्यांनी आणली होती आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ही गाथा त्यांनी आदरणीय वाळेकर मामा यांच्याकडे सुपूर्द केली.मामांनी ती गाथा दोन भागात बायडिंग करून अगदी अखेरपर्यंत जीवापाड जपली.! चिखलकर मास्तर आपल्या घरी ते नित्य नेमाने भजन करायचे. त्यात पेटी वादक रामा कांबळे पखवाज वादक संभानाना म्हणजे संभा उर्फ गुंडू भुजिंगाव कांबळे,आणखी पखवाज वादक तुका नाना म्हणजे तुकाराम पाटील,हाळावरचे अण्णा पांडुरंग (आत्माराम) पाटील हे पण अधे मध्ये पखवाज साथ करायचे तर नाथा जाधव, नारायण पाटील, धोंडीराम वाळेकर मामा, मधुकर बंडू भोसले, श्रीपती कृष्णा कांबळे,राऊ लोहार, शिवा आबा कांबळे, गणपती कांबळे,हरी राऊ वांगळे, रखमाबाई काटकर,शिवराम चांभारची आई बहिणाबाई अशी काही मंडळी साथीला असायची.
लवाटे गुरुजी यांनी विठ्ठल मंदिराचा विस्तार करण्यापूर्वी आताच्या मंदिराच्या अर्ध्यापेक्षा कमी लांबीचे जुने साध्या कौलाचे फक्त हनुमान मंदिर होते.चिखलकर मास्तरांच्यातील भजन हे या जुन्या हनुमान मंदिरात व पुढे ते नव्या विठ्ठल मंदिरात समाविष्ट झाले.
पण मूळ गावात भजनी परंपरेला सक्षम करण्याचे काम करण्यात चिखलकर मास्तरांचे योगदान मोठे आहे.1985ला त्यांचे निधन झाले.त्यांचे सुपुत्र आदरणीय अनंत उर्फ धोंडीराम मामा हे देखील सांप्रदायिक सेवेत मनोभावे रत आहेत.लष्करातून निवृत्त झाल्यावर त्यांनी सांप्रदायिक सोबत संचार अभ्यास वाढवला..बसल्यानंतर एक पायाचीच मांडी घालावी लागते तरीही ते अजून पारायण सेवेत बसतात.
यंदा हरिनाम सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण रद्द केले पण ज्याच्या त्याच्या घरी पारायण करण्याचे आवाहन करण्यात आले.त्यानुसार आदरणीय चिखलकर मामा यांच्या घरी अनंत जाधव मामा यांच्यासह त्यांचा नातू, नात,प्रभाकर वांगळे यांची कन्या व तुकाराम जाधव यांचा मुलगा असे पाच जण बरोबर सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून पारायनाला बसले आहेत.हा योग पाहता ज्या घराने गावातील भजनी परंपरेची मुळे समृद्ध केली त्या च घरात हे पारायण म्हणजे पुन्हा एकदा मुळाकडे जाणारा प्रवास झाला आहे असे वाटते. याबरोबरच यंदा भानुदास पांडुरंग पाटील,विशाल जयवंत इंगळे,बाळासो गणपती वाळेकर हे देखील आपल्या घरी तर कोल्हापुरात राहणाऱ्या सौ.अर्चना आप्पासो(पोपटदा) पाटील तसेच सौ. सरस्वती प्रकाश(अण्णा) पाटील पारायण सेवेस बसले आहेत.
मधुकर शरद भोसले
बस्तवडे ता कागल
प्रतिनिधी दै.पुढारी
टीप: सदरचे लेखन हे जुन्या पिढीतील काही ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करून केले आहे.काही नामोल्लेख किंवा संदर्भ राहण्याची पण शक्यता नाकारता येत नाही
0 Comments